Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Thursday, May 17, 2007

सूर्यास्त

गोंद्लेल्या कपाळावर,कुंकवाचा लाल सूर्य
भोवती जमलेले, दमलेले घामाचे थेंब
कडुसं पडस्तवर, राबणारे हात तिचे
अन पोटात भुकेचा आगडोंब

सगळं सहन केलं तिनं

घरधनी जंवर उभा होता
वाघावाणी धावू धावू
सोबत तोही राबत होता


पण सावकारी पाशानं न सरकारी जाचानं
काळजीच्या काळ्या डोहात तो बुडाला
हाताच्या खुंट्या डोईपाशी धरून
उगामुगा बसून राहू लागला

आढ्याला मग दोरी बांधून
आयुष्याचा झोका त्यानं आभाळात नेला
मागं वळून न बघताच
एका झट्क्यात पार निघाला

हिच्या कपाळाचा सूर्य मावळला
भरदिवसा दाहीदिशा अंधार पडला
डोळे फाडफाडून पाह्यलं तरी
उजेडाची तिरीप गवसंना तिला

सरकारी माणूस जीपमधून आला
पोट सुटलॆला अन सफारी घातलेला
म्हणाला," मदत दाराशी आणली,
पाच टक्क्यावर करू मांडवली"

"संसाराचा माझ्या इस्कोट झाला
अन आता यायला सुचलं का तुला ?
आतातरी आलास कशाला
चितेला आमच्या आगी लावायला ?
मुडद्या तुझं बशिवलं मढं !"
बोलताना तिला आलं रडं

पोरांकडे पाहून आवंढा गिळला
सरकारी मदतीचा चेकही घेतला
आयुष्याचे चाक आता पुन्हा फिरते
ती मात्र मनात अजुनही रडते.