Thursday, May 17, 2007

ससोबांचे ऑपरेशन

एक होता ससा
त्याने खाल्ला मासा

काटा अडकला घशात
पाणी आले डोळ्यात

डॉक्टर बनून कोल्होबा आले
ऑपरेशन करावे लागेल म्हणाले

ससोबांचे झाले ऑपरेशन
अन कोल्होबांचे जेवण.

सूर्यास्त

गोंद्लेल्या कपाळावर,कुंकवाचा लाल सूर्य
भोवती जमलेले, दमलेले घामाचे थेंब
कडुसं पडस्तवर, राबणारे हात तिचे
अन पोटात भुकेचा आगडोंब

सगळं सहन केलं तिनं

घरधनी जंवर उभा होता
वाघावाणी धावू धावू
सोबत तोही राबत होता


पण सावकारी पाशानं न सरकारी जाचानं
काळजीच्या काळ्या डोहात तो बुडाला
हाताच्या खुंट्या डोईपाशी धरून
उगामुगा बसून राहू लागला

आढ्याला मग दोरी बांधून
आयुष्याचा झोका त्यानं आभाळात नेला
मागं वळून न बघताच
एका झट्क्यात पार निघाला

हिच्या कपाळाचा सूर्य मावळला
भरदिवसा दाहीदिशा अंधार पडला
डोळे फाडफाडून पाह्यलं तरी
उजेडाची तिरीप गवसंना तिला

सरकारी माणूस जीपमधून आला
पोट सुटलॆला अन सफारी घातलेला
म्हणाला," मदत दाराशी आणली,
पाच टक्क्यावर करू मांडवली"

"संसाराचा माझ्या इस्कोट झाला
अन आता यायला सुचलं का तुला ?
आतातरी आलास कशाला
चितेला आमच्या आगी लावायला ?
मुडद्या तुझं बशिवलं मढं !"
बोलताना तिला आलं रडं

पोरांकडे पाहून आवंढा गिळला
सरकारी मदतीचा चेकही घेतला
आयुष्याचे चाक आता पुन्हा फिरते
ती मात्र मनात अजुनही रडते.








































अभंग


विश्वचैतन्याचा गाभा

माझा पांडुरंग उभा


ह्याचे पायी तिन्ही लोक

सार वेदांताचे येक


भक्ती हीच त्याची पूजा

मनी भाव नको दूजा


पुंडलिकाचे उपकार

किती स्मरू वारंवार


पूर्ण कल्पना निर्गुण

झाली साकार सगुण


नामा माझा, तुका माझा

चोखा, सावता मायेचा


जनाबाई माझी माय

पांडुरंगी रंगुन जाय


ऐसा भक्तीचा सोहळा

दुमदुमे त्रिखंड्माळा


वैष्ण्वांच्या गळाभेटी

दिंड्या पताकांची दाटी


वीट एकावरी एक

रचिले राऊळ सुरेख


जीवाशिवाचा अभेद

इथे संपलाच शोध.


























श्रीसाईसेवा




शिर्डी नगरी अति पवित्र
भाग्य तिचे कसे विचित्र

सगळ्या ब्रह्मांडाचे स्वामी
साक्षात्कारी, अंतर्यामी

नसता कुणाच्या ध्यानीमनी
अवतरले त्या स्थानी

ब्रह्म चालले भूवरी
पुण्यसंचय कितीतरी

साईचरणांची धूळ
साऱ्या ब्रह्मांडाचे मूळ

धन्य धन्य साईनाथा
धन्य तुमची जीवनगाथा

"श्रद्धा" आणि "सबुरी"
केला उपदेश शिर्डीपुरी

"मालिक सबका एक"
साई सर्व विश्वात्माक

साई चरणी शत प्रणाम
मोहमायेला पूर्णविराम

साईनाम मुखे घ्यावे
प्रचितीने विस्मित व्हावे

दुस्तर हा भवसागर
साईकृपे करूया पार

मग ब्रह्मांनंदाचा ठेवा
साईनाथा मजला द्यावा.

Wednesday, May 16, 2007

काव्यवेद

काव्यावेद हा मला सुचलेल्या कवितांचा संग्रह आहे.